कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी रघुनाथ देवगोंडा पाटील (चंदूर, ता. हातकणंगले) यांची, तर व्हाईस चेअरमनपदी शरदचंद्र विश्वनाथ पाठक (कुन्नूर, ता. निपाणी) यांची एकमताने निवड झाली. श्री दत्त साखर कारखान्याच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक मंडळाची विशेष सभा पार पडली. यावेळी कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी चेअरमन पदासाठी रघुनाथ पाटील यांचे नाव सुचविले, त्यास ज्येष्ठ संचालक अनिलकुमार यादव यांनी अनुमोदन दिले. चेअरमन पदासाठी रघुनाथ पाटील यांचे एकमेव नाव पुढे आल्याने त्यांची एकमताने निवड झाली.
व्हा. चेअरमन पदासाठी कारखान्याचे व्हा. चेअरमन अरुणकुमार देसाई यांनी पाठक यांचे नाव सुचवले, त्यास ज्येष्ठ संचालक इंद्रजित पाटील यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमन पदासाठी पाठक यांचे एकमेव नाव पुढे आल्याने त्यांचीही निवड एकमताने झाली. श्री दत्त कारखान्याचे व्हाईस चेअरमन हे पद नेहमीच कर्नाटक राज्यातील संचालकांना देण्याचा निर्णय माजी चेअरमन स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांनी घेतला होता. आताही कुन्नूर येथील शरदचंद्र पाठक यांना व्हाईस चेअरमन पदाची संधी देत कर्नाटक राज्यातील संचालकांना व्हाईस चेअरमनपद देण्याची परंपरा कायम राखली.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा उपनिबंधक सुनील धायगुडे, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे, अमर यादव, अरुणकुमार देसाई, बाबासो पाटील, बसगोंडा पाटील, दरगू माने-गावडे, जोतीकुमार पाटील, निजामसो पाटील, प्रमोद पाटील, शेखर पाटील, सिद्धगोंडा पाटील, श्रीमती विनया घोरपडे, विश्वनाथ माने, अस्मिता पाटील, संगीता पाटील-कोथळीकर, सुरेश कांबळे, इंद्रजित पाटील, रणजीत कदम, पदाधिकारी उपस्थित होते.