सोलापूर: उमरगा तालुक्यातील शेतकरी संघटना, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मातोश्री कारखान्याकडील थकीत ऊस बिलाच्या वसुलीसाठी सोमवारी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या जोडभावी पेठेतील घरासमोर ठिय्या आंदोलन केले. अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री कारखान्याकडे शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहेत. दरम्यान,आंदोलनावेळी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, शिवराज म्हेत्रे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील,कोणाचेही पैसे बुडणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश बनसोडे यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी मातोश्री कारखान्याला ऊस घातला आहे.कारखान्याने यंदाच्या हंगामातील ऊस बिल दिलेले नाही.शेतकरी वारंवार कारखान्यावर जातात आणि केवळ आश्वासन घेऊन परत येतात.बिल थकल्यामुळे अनेक प्रपंच चालवावा लागत आहे. आता तिसऱ्यांदा आंदोलन करावे लागले.ऑगस्टमध्ये ऊस बिल न मिळाल्यास म्हेत्रे यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन केले जाईल,असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.