धाराशिव : तुळजाभवानी साखर कारखाना अर्थात गोकुळ शुगर इन्स्टिट्यूटने गळीत हंगाम २०२३-२०२४ मधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले थकवली आहेत. त्यासह कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या पगारही थकीत आहे. याप्रश्नी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अमोल शिवाजी जाधव, राहुल खपले यांच्या उपस्थितीत ‘भीक मागो’ आंदोलन करण्यात आले. १० ऑगस्टपर्यंत पैसे न मिळाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अमोल जाधव यांनी दिला आहे.
‘भीक मांगो’ आंदोलनात जमा झालेल्या पैशातून साडी-चोळी घेण्यासाठी धाराशिवचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, तुळजापूर तालुक्याचे आमदार, सहनिबंधक, उपनिबंधक, माजी आमदार, कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना मनीऑर्डर केली जाईल असे अमोल जाधव यांनी सांगितले. तुळजापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक राहुल खपले, नवनाथ जगताप, राज खपले, शरद जगदाळे, शेतकरी सतीश आडे, महेश कोळेकर, अंकुश कोकरे, विजू नाईक, संतोष गाडे, अर्जुन कोळेकर, संदेश माने, चेतन गोरे, अंगद इंगळे, अजित तांबे, दगडू पटेल, अजित क्षीरसागर, धुळाजी कोळेकर, संजय देशमुख, योगेश शिंदे आदींसह शेतकरी व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.