कोल्हापूर: केंद्र सरकारने साखरेची MSP वाढवावी यासाठी साखर उद्योगातून सतत पाठपुरावा केला जात आहे. सध्या प्रती क्विंटल ३,१०० रुपये MSP आहे. यामध्ये वाढ केल्यास साखर उद्योगासमोरील अडचणी सुटतील, असे मत कुंभी-कासारी कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केले. कुडित्रे येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या मिल रोलर पूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी व्हाईस चेअरमन राहुल खाडे होते. शासनाने साखर कोट्यावर निर्बंध, साखर निर्यात बंदी व इथेनॉल निर्मितीवर मर्यादा घातल्याने साखर उद्योगाची कोंडी झाली आहे असे नरके म्हणाले.
यावेळी कारखान्याने आगामी हंगामाची गतीने तयारी सुरू केल्याचे नरके यांनी सांगितले. ते म्हणाले की, कारखान्याकडे १०,१९९ हेक्टर ऊस क्षेत्रांची नोंद झाली आहे. यापैकी ५५३६ हेक्टर लागण व ४,६६३ हेक्टर खोडवा आहे. कारखान्यात यंत्रसामुग्री देखभाल, दुरूस्तीची कामे सुरू आहेत. यावेळी संचालक अॅड. बाजीराव शेलार, उत्तम वरुटे, विलास पाटील, अनिल पाटील, विश्वास पाटील, संजय पाटील, किशोर पाटील, दादासो लाड, सर्जेराव हुजरे, सरदार पाटील, अनिष पाटील, प्रकाश पाटील, बळवंत पाटील, वसंत आळवेकर, पी. डी. पाटील, राऊ पाटील, प्रकाश पाटील, प्रमिला पाटील, धनश्री पाटील आदी उपस्थित होते.