सोळंके कारखान्याच्या थकीत ऊस बिलप्रश्नी साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

बीड: लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याने चार महिन्यांपासून थकवलेल्या ऊस बिलप्रश्नी काँग्रेस नेते हरिभाऊ सोळंके यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. साखर कारखान्याने १२ मार्चपासून ऊस बिले दिलेली नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत सोळंखे यांनी साखर आयुक्तांना निवेदन दिले आहे. थकीत बिले तातडीने द्यावीत आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत त्वरीत कार्यवाही न केल्यास ५ ऑगस्टपासून साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करू,असा इशारा त्यांनी दिला आहे.

याबाबत हरिभाऊ सोळंके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोळंके कारखान्याने गेल्यावर्षीच्या ऊस बिलातील देखील प्रती टन १४९ रुपये दिलेले नाहीत. यंदाही ऊस बिले थकवली आहेत. पैसे देण्यास कारखाना टाळाटाळ करीत आहे. खरेतर नियमानुसार कारखान्याला ऊस गाळप झाल्यापासून १५ दिवसांत पैसे मिळायला हवेत. परंतु चार महिने उलटूनही कारखान्याने दुर्लक्ष केले आहे. आठ दिवसांत थकीत बिले व मागील वर्षाची रक्कम द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत लोकनेते सोळंके कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. सी. बडगुजर यांनी सांगितले की, गेल्या ३३ वर्षांपासून कधीही शेतकऱ्यांची बिले थकीत राहिली नाहीत. परंतु यंदा केंद्र सरकारने इथेनॉलबाबत घेतलेल्या निर्णयाचा फटका कारखान्याला बसला. त्यामुळे पैसे देण्यास उशीर झाला आहे. पुढील १५ दिवसांत पैसे देण्याचे प्रयत्न आहेत.

साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here