भोगावती कारखाना ऑलिम्पिक पदकविजेत्या स्वप्निलची हत्तीवरून मिरवणूक काढणार : अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील

कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्यावतीने उदयोन्मुख नेमबाजपटू स्वप्निल कुसाळे याचा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत कांस्यपदक पटकावल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात येणार आहे. कारखान्याच्यावतीने त्याला एक लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. स्वप्नीलची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येणार असून यात भोगावती कार्यक्षेत्रातील सहकारी संस्था, शिक्षण संस्था, तरुण मंडळे व सभासद व सर्वच कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.

अध्यक्ष प्रा. पाटील यांनी सांगितले की, भोगावती साखर कारखाना परिवाराशी कुसाळे कुटुंबाची नाळ जुळलेली आहे. स्वप्निल कुसाळे हा शिक्षणाच्या माध्यमातून भोगावती परिवाराशी जोडला गेला आहे. स्वप्निल हा कारखाना कार्यक्षेत्रातील कांबळवाडी गावचा रहिवासी असून त्याचे वडील सुरेश कुसाळे कारखान्याचे सभासद आहेत. स्वप्निलने कारखान्याच्या राजर्षी शाहू पब्लिक स्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. आशियाई स्पर्धेतील यशाबद्दल एक वर्षापूर्वी भोगावती कारखान्याने केलेल्या स्वप्निलच्या सत्कारावेळी कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष, दिवंगत आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांनी स्वप्निलने ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवल्यास हत्तीवरून मिरवणूक काढू, असे जाहीर केले होते. तो शब्द त्यांच्या पश्चात आम्ही पूर्ण करीत असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी संचालक रघुनाथ जाधव, पांडुरंग पाटील, प्रा. सुनील खराडे, शिवाजी कारंडे, काटकर, डी. आय. पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील व सचिव उदय मोरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here