पुणे : देशात यंदा, गळीत हंगाम २०२४-२५ साठी ५६.१ लाख हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. तर इथेनॉलसाठी साखर, साखरेचा रस, पाक, मोलॅसिस वळविण्याअगोदर म्हणजे एकूण साखर उत्पादन ३३३ लाख टन साखर उत्पादीत होईल असा अंदाज द इंडियन शुगर मिल्स अॅण्ड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने (इस्मा) वर्तविला आहे. केंद्र सरकारने इथेनॉलसाठी किती साखरेचा वापर करावयाचा, याचे धोरण अद्याप जाहीर केले नाही. जागतिक साखर वापरात भारत आघाडीवर असून, एकूण उत्पादनाच्या १५.५ टक्के साखरेचा वापर होतो. दरम्यान, साखर निर्यात, इथेनॉल उत्पादनावर निर्बंधांमुळे साखर उद्योग संकटात असल्याची स्थिती आहे.
सद्यस्थितीत देशात साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असून, सर्वाधिक ११० लाख टन साखर उत्पादन राज्यात झाले आहे. केंद्र सरकारने २०२३-२४ च्या गळीत हंगामात साखर उत्पादनात घट येण्याच्या अंदाजामुळे इथेनॉल निर्मितीवर निर्बंध घातले होते. ४५ लाख टन साखरेचा इथेनॉलसाठी वापर होण्याची शक्यता असताना सरकारने फक्त १७ लाख टन साखरेचा इथेनॉलसाठी वापर करण्यास परवानगी दिली. उसाचा रस आणि बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्यामुळे त्याच्या उत्पादनात मोठी घट झाली. हंगामात ४५० कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाऐवजी फक्त ३२५ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन झाले.
महाराष्ट्रातील कारखान्यांचे सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच साखर निर्यात बंदीचा राज्याला मोठा फटका बसला. साखर निर्यातीबाबत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातला साखर निर्यातीसाठी अनुकूल स्थिती असते. एकूण साखर निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा सरासरी ६० टक्के आहे. त्यामुळे निर्यात बंदीचा राज्याला मोठा फटका बसला आहे. सद्यस्थितीत साखरेची एमएसपी ठरवण्यासह उपलब्ध साखर, संभाव्य उत्पादन आणि उसाची उपलब्धता यांचा आढावा घेऊन केंद्राने साखर उद्याोगाबाबतचे धोरण जाहीर केले पाहिजे असे तज्ज्ञांचे मत आहे.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.