पुणे: केंद्र सरकारच्या राष्ट्री य कृषी विकास योजनेतून अनुदानावरील ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त सुमारे 11 हजार 34 अर्जांमधून 800 अर्जधारकांची निवड दुसर्यांदा झालेल्या संगणकीय सोडतीमध्ये करण्यात आली आहे. आरकेव्हीवायअंतर्गत 2022-23 व 2023-24 या दोन वर्ष कालावधीत 900 ऊसतोडणी यंत्रखरेदीवर खरेदी किंमतीच्या 40 टक्के अथवा 35 लाख रूपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान स्वरूपात देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
दरम्यान, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंर्गत ऊसतोडणी यंत्रास अनुदान प्रकल्पांतर्गत पहिल्या लॉटरीमध्ये साखर आयुक्तालयाने 373 अर्जदारांना ऊस तोडणी यंत्रखरेदीसाठी पूर्व संमती देण्यात आली होती. त्यापैकी 100 यंत्रे खरेदी करण्यात आली आहेत. त्या सोडतीमधील पहिल्या 5 यंत्रधारक लाभार्थ्याच्या बँक कर्ज खात्यात एकूण 1 कोटी 69 लाख 75 हजार 31 रूपये इतके अनुदान 28 जून रोजी जमा करण्यात आले आहे. साखर आयुक्तालयास योजनेनुसार कृषी आयुक्तालयाने आरकेव्हीवायमधून अनुदानासाठी आता नव्याने 14 कोटी रूपये दिलेले आहेत. त्यानुसार राज्यातील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून आलेल्या ऑनलाइन अर्जानुसार लाभार्थ्याची यादी तयार करण्यात आलेली आहे. ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेत पहिली सोडत ही राज्यस्तरीय होती. दुसर्या सोडतीमध्ये जिल्हानिहाय करण्यात आल्याने सर्वत्र ऊसतोडणी यंत्रांची उपलब्धता वाढण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.