कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी काढण्यात आलेल्या सौद्यात गुळाला ५,००० रुपये क्विंटल असा विक्रमी दर मिळाला. गेल्या पाच वर्षात या हंगामात काढण्यात आलेला हा विक्रमी दर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. साताप्पा बुर्गे यांच्या अडत दुकानात हे सौदे काढण्यात आले. वरणगे (ता. करवीर) येथील शेतकरी प्रकाश पाटील व ओंकार पाटील यांनी गूळ आणला होता. ईश्वरराल पटेल यांनी हा गुळ खरेदी केला.
याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी सांगितले की, हंगाम सुरू होण्यासाठी एक ते दीड महिना अवधी आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांनी गुऱ्हाळे सुरू केली आहेत. बाजार समितीत दररोज ७ ते ८ हजार गूळ रव्यांची आवक होत आहे. कोल्हापुरी गुळाला नेहमीच चांगली मागणी असते. सध्या मुंबई, गुजरातसह अन्य भागातून कोल्हापुरी गुळाला मागणी आहे. त्यामुळे दर चांगला मिळत आहे. शेतकऱ्यांनी आपला गूळ बाजार समितीच्या मार्केटमध्ये आणावा. दरम्यान, हंगाम सुरू नसतानासुद्धा गुळास पाच हजार दर मिळाल्याने गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.