पांडुरंग साखर कारखान्याला NFCSF तर्फे तांत्रिक कार्यक्षमतेच्या प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

सोलापूर: नॅशनल फेडरेशन को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज (NFCSF) कडून कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीत केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल, उत्तर प्रदेशचे सहकारमंत्री लक्ष्मीनारायणसिंह चौधरी आणि नॅशनल फेडरेशन को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कारखान्याचे व्हा. चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, संचालक व अधिकारी यांनी स्वीकारला.

नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑप. शुगर फॅक्टरीज (NFCSF) तर्फे गुणवत्ता पारितोषिक वितरण कार्यक्रम १० ऑगस्टला डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर,नवी दिल्ली येथे पार पडला. यात विविध प्रकारांमध्ये देशातील २१ साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यामध्ये सर्वाधिक १० पुरस्कार महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना मिळाले. देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याला दिला जाणारा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे.

चेअरमन प्रशांत परिचारक म्हणाले की, पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा नेहमीच देशात अग्रेसर राहिला आहे. हंगाम २०२३-२४ मध्ये गाळप क्षमतेचा पुरेपूर वापर, स्टीमची बचत, कारखाना बंदचे अत्यल्प प्रमाण, बगॅसची बचत, जादा वीज निर्मिती, जास्त साखर उतारा व तांत्रिक बाबींमध्ये उल्लेखनीय कार्यामुळे कारखान्यास देशपातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. कारखान्याची गाळप क्षमता १०,००० मे. टन प्रती दिन आहे. यंदा ११ हजार हेक्टर क्षेत्राच्या नोंदी असून १२ ते १२.५ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिनकर मोरे, दाजी पाटील, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमार, भगवानराव चौगुले, भास्कर कसगावडे, लक्ष्मण धनवडे, गंगा विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हनुमंत कदम, दिलीप गुरव, श्यामराव साळुंखे, राणू पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here