सोलापूर: उजनीच्या लाभक्षेत्रात आडसाली ऊसासाठी लगबग, यंदा विक्रमी लागवड शक्य

सोलापूर: सध्या या परिसरात आडसाली ऊस लागणीची लगबग सर्वत्र दिसून येत आहे. एकूण शेतकऱ्यांचा कल पाहता, उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात यावर्षी विक्रमी ऊस लागवड होईल, असा अंदाज सर्वत्र व्यक्त होत आहे. यंदा जुलै-ऑगस्ट मध्ये पुणे जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्यामुळे उजनी धरण सध्या १०६ टक्के भरले आहे. त्यामुळे कालवा, बोगदा सीना नदी, सीना-माढा व दहिगाव सिंचन योजना याद्वारे पाटबंधारे खात्याने विसर्ग स्रोत चालू केले आहेत. आता नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आडसाली ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.

सध्या लागणीसाठी प्रति एकरी एक गुंठा बेणे गृहीत धरले तर बेण्याचा भाव सहा ते सात हजार रुपये प्रति गुंठा आहे, मजुरी सहा ते सात हजार रुपये द्यावी लागत आहे, तसेच लागणीच्या वेळी रासायनिक द्रवरूप व बेसल डोसचा खर्च कमीत कमी तीन ते चार हजार रुपये येत आहे, अशा प्रकारे सुरुवातीला एक एकर ऊस लागणीसाठी अंदाजे ३० ते ३५ हजार रुपये प्रति एकरी खर्च येत आहे. शेतकऱ्यांनी मागील दोन-तीन महिन्यात जमिनीची नांगरट, मेहनत मशागत करून ठेवलेली असल्यामुळे सध्या फणपाळी केली जात आहे. ऊस लागवडीसाठी पाच फूट रुंदीची सरी सोडली जात आहे. लागणीसाठी को २६५, कोएम ८६०३२ व व्हीएसआय व पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्राने प्रमाणित केलेल्या व शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बेणेमळ्यातून काही नवीन वाणांची निवड शेतकरी करत आहेत. काही ठिकाणी कालव्याच्या किंवा पाईपलाईनच्या पाण्यावर पाटाद्वारे तर ७५ ते ८० टक्के शेतकरी ठिबक पसरून एक ते दीड फूट अंतरावर बेणे टाकून लागण करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here