पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर साखर कारखान्याचा राज्यात उच्चांकी ३,७७१ रुपये ऊस दर जाहीर

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२३- २४ साठी उसाला प्रती टन अनुदानासह ३,७७१ रुपये दर जाहीर केला आहे. एफआरपीपेक्षा तब्बल ६९७ रुपये जास्त दर देण्यात आला आहे. अशा प्रकारे जादा दर देणारा सोमेश्वर राज्यात पहिलाच कारखाना ठरला, अशी माहिती माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. जगताप यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कारखान्यावर असणारे लक्ष व त्यांचे वेळोवेळीचे मार्गदर्शन, संचालक मंडळाचे काटकसरीचे धोरण यामुळे सोमेश्वर सर्वोच्च ऊसदराची परंपरा कायम राखू शकला, असे जगताप म्हणाले.

कारखान्याने गत हंगामासाठी ३,५७१ रुपये उच्चांकी ऊसदर जाहीर केला आहे. सभासद व बिगर सभासदांच्या जानेवारीमध्ये तुटणाऱ्या उसास ७५ रुपये, फेब्रुवारीमध्ये तुटणाऱ्या उसास १०० रुपये, मार्चमध्ये तुटणाऱ्या उसास १५० रुपये व नंतर हंगाम संपेपर्यंत तुटणाऱ्या उसास २०० रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. अनुदानासह जानेवारीमध्ये तुटलेल्या उसास ३,६४६ रुपये, फेब्रुवारीमधील उसाला ३,६७१ रुपये, मार्चसाठी ३,७२१ रुपये दिला गेला आहे. गत हंगामात सोमेश्वरने एकूण १५ लाख २३ हजार ८७६ मेट्रिक टनाचे गाळप केले असून, बी हेवीसह सरासरी १२.२१ टक्के साखरउतारा राखत १८ लाख २६ हजार ५०० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. गत हंगामाची एफआरपी २ हजार ८७३ रुपये होती. त्यापैकी आजवर ३ हजार १०० रुपये दिले आहेत. पुढील महिन्यामध्ये १०० ऊस प्रोत्साहन अनुदान हे सभासदांच्या खात्यावर वर्ग केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, संग्राम सोरटे, ऋषिकेश गायकवाड, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here