कोल्हापूर : जिल्ह्यातील हजारो नागरिकांच्या साक्षीने भोगावती सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ऑलिम्पिकवीर कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसाळे याची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. परिते (ता. करवीर) येथे स्वप्निलचे ढोल, ताशा, मर्दानी खेळ, लेझीम, हालगीच्या कडकडाटामध्ये स्वागत करण्यात आले. शालेय मुलांसह युवावर्गाने शिस्तबध्दरित्या मिरवणूक काढली. त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कारखान्याच्यावतीने जि. प. चे माजी अध्यक्ष राहुल पाटील-सडोलीकर यांच्या हस्ते स्वप्नील याला १ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेशही देण्यात आला.
यावेळी ‘भोगावती’चे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजु कवडे, आ. प्रकाश आबिटकर, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे, गोकुळचे संचालक आर. के. मोरे, बाळासो खाडे, राधानगरी काँग्रेसचे अध्यक्ष हिंदुराव चौगले, शेकापचे केरबा भाऊ पाटील, अक्षय पाटील सडोलीकर, जनता दलाचे वसंतराव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात डोंबिवली बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक संजय खाडे, राजेंद्र तेली यांनी स्वप्निलला २१ हजाराचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. स्वप्निलचे प्रशिक्षक अक्षय अष्टपुत्रे, दिपाली देशपांडे यांचाही सत्कार करण्यात आला.