ब्रिस्बेन : लॅन्झाटेक ग्लोबल इंकने ऑस्ट्रेलियाच्या वॅग्नर सस्टेनेबल फ्युएलसोबत नवीन प्रकल्पाची घोषणा केली. हा प्रकल्प वॅगनरच्या ब्रिस्बेन SAF रिफायनरीमध्ये सर्क्युलएअर प्लॅटफॉर्मच्या एकत्रीकरणाचे मूल्यांकन करेल. लॅन्झाटेक आणि लॅन्झाजेटद्वारे संयुक्तपणे विकसित केलेला हा प्लॅटफॉर्म कचरा कार्बन आणि अक्षय उर्जेचे शाश्वत विमान इंधन (SAF) मध्ये रूपांतरित करतो. लॅन्झाटेक आणि लॅन्झाजेट यांच्या व्यावसायिक भागीदारी व्यतिरिक्त, प्रकल्पाला बोईंग कंपनी आणि क्वीन्सलँड सरकारकडून आर्थिक पाठबळ मिळाले आहे. या उपक्रमामुळे क्वीन्सलँडमध्ये रोजगार निर्मिती, ऑस्ट्रेलियाची देशांतर्गत ऊर्जा सुरक्षा मजबूत करणे आणि जागतिक विमान उत्सर्जन कमी करण्यात योगदान देणे यासह अनेक फायदे मिळतील अशी अपेक्षा आहे.
लॅन्झाटेकचे सीईओ आणि लॅन्झाजेटच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉ. जेनिफर होल्मग्रेन यांनी या सहकार्याच्या महत्त्वावर भर देताना सांगितले की, “वॅग्नर सस्टेनेबल फ्युएलसोबतचे आमची संयुक्त भागिदारी ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत SAF मार्केटच्या वाढीला गती देईल. दरवर्षी वापरल्या जाणाऱ्या १०० अब्ज गॅलन जीवाश्म जेट इंधनाला पुनर्वापर केलेल्या कार्बनपासून बनवलेल्या इंधनाने बदलण्यासाठी पुरेसा कार्बन उपलब्ध आहे. सर्क्युलएअर प्लॅटफॉर्मची लवचिकता आम्हाला स्थानिक मागणी पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील कचरा-आधारित संसाधनांच्या विस्तृत श्रेणीचा वापर करण्यास अनुमती मिळेल.
सर्क्युलएअरची प्रक्रिया लॅन्झाटेकच्या तंत्रज्ञानाने सुरू होते, जी औद्योगिक उत्सर्जन आणि महानगरपालिका घनकचरा यासह स्थानिक कचरा प्रवाहाचे कार्बन स्मार्ट इथेनॉलमध्ये रूपांतर करते. लॅन्झाजेटच्या अल्कोहोल-टू-जेट (एजेटी) तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रॉप-इन SAF तयार करण्यासाठी या इथेनॉलवर प्रक्रिया केली जाते.
लॅन्झाजेटचे सीईओ जिमी समार्त्झिस यांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, वॅग्नर सस्टेनेबल फ्यूल्स प्रकल्प ऑस्ट्रेलियाला SAF उत्पादनात अग्रेसर स्थान देतो, विविध प्रकारच्या टाकाऊ कार्बनचे शाश्वत इंधनात रूपांतर करण्यासाठी सर्क्युल एअर प्लॅटफॉर्मचा लाभ घेतो. लॅन्झाजेटच्या एसएएफ तंत्रज्ञानाला लॅन्झाटेकच्या कार्बन रिसायकलिंग कौशल्याची जोड देऊन, आम्ही स्थानिक नूतनीकरणक्षम कचरा संसाधनांचा वापर करून देशांतर्गत एसएएफ पुरवठा शृंखला स्थापन करू शकतो. ऑस्ट्रेलियाच्या पर्यावरणाचे संरक्षण करताना ऊर्जा सुरक्षा वाढवू शकतो.
२०५० पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विमान उद्योगासाठी SAF उत्पादनाचा विस्तार महत्त्वाचा आहे. एसएएफ ६५-७०ने उत्सर्जन कमी करेल,अशी अपेक्षा आहे. तथापि, पुरवठ्याची कमतरता, उच्च खर्च आणि तांत्रिक आव्हानांमुळे एसएएफचा व्यापक अवलंब करण्यात अडथळा निर्माण झाला आहे. वॅग्नर सस्टेनेबल फ्यूल्सचे सीईओ मॅट डॉयल यांनी या सहकार्याबद्दल आशावाद व्यक्त केला. ते म्हणाले, “लॅन्झाटेक आणि लॅन्झाजेटसोबतची आमची भागीदारी वॅग्नर SAF रिफायनरीला चालना देईल, ऑस्ट्रेलियाच्या SAF उद्योगाला गती देईल आणि २०५० पर्यंत एव्हिएशन डीकार्बोनायझेशनला समर्थन देईल.