कोल्हापूर : ‘दौलत’च्या शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले ‘अथर्व’ने देण्याचा साखर सहसंचालकांचा निर्णय

कोल्हापूर : दौलत साखर कारखान्याला २०१०-११ या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची थकीत रक्कम अथर्व कंपनीने अदा करावी, असा निर्णय प्रादेशिक साखर सहसंचालकांनी दिला आहे. अॅड. प्रा. एन. एस. पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दौलत बचाव समिती व ब्लॅक पँथर संघटनेकडून यासाठी पाठपुरावा सुरू होता.

पाटील यांनी सांगितले की, २०१९ मध्ये दौलत कारखाना जिल्हा बँकेने अथर्व कंपनीला ३९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर चालवण्यास दिला आहे. बँकेचे कर्ज ६७ कोटींचे होते. तसेच २०१०-११ च्या गळीत हंगामातील तासगावकर शुगरच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची काही देणी शिल्लक होती. त्याचवेळी शेतकऱ्यांची ही रक्कम देण्यासाठी नियोजन करणे आवश्यक होते; मात्र तसे झाले नाही. यामुळे सहा महिन्यांच्या सुनावणीनंतर साखर सहसंचालकांनी निवाडा केला असून, कराराप्रमाणे अथर्वने एफआरपीची उर्वरित रक्कम अदा करण्याचा निर्णय दिला आहे. यावेळी सुभाष देसाई, तानाजी गडकरी, एम. एम. तुपारे, शामराव मुरकुटे, पांडुरंग बेनके, विष्णू गावडे, विलास पाटील, ए. एस. जांभळे, शिवाजी तुपारे, विष्णू कार्वेकर, गोविंद पाटील आदी उपस्थित होते.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here