ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न सोडवा, अन्यथा कोयता बंद : मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन

कोल्हापूर : सिटू संलग्न महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेने गुरुवारी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रलंबित मागण्यांबाबत निवेदन दिले. ऊस तोडणी व वाहतूक कामगारांची महामंडळात नोंदणी करून ओळखपत्र व सामाजिक सुविधा सुरू करावी यांसह विविध मागण्यांबाबत गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी निर्णय न झाल्यास कोयता बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष जाधव, जिल्हा सेक्रेटरी प्रा. आबासाहेब चौगले, उत्तम पाटील, रामचंद्र कांबळे, पांडुरंग मगदूम, आनंदा डाफळे आदींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

जिल्ह्यातील सर्व ऊस तोडणी वाहतूक कामगार, ऊस वाहतूकदार यांची महामंडळात नोंदणी करून ओळखपत्र द्यावे, कामगारांना १० लाख रुपयांचा अपघात विमा संरक्षण व औषधोपचारांची सुविधा द्यावी, अपघाती, नैसर्गिक मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, महामंडळाने जाहीर केलेली ८२ वसतिगृहे सुरू करावीत, २०२४ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर कारखान्यांकडून गेल्या तीन वर्षांचा देय असलेला निधी जमा करून घेतल्याशिवाय ऊस गाळपास परवानगी येऊ नये आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे. राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार होता; परंतु जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिल्यामुळे हा मोर्चा स्थगित करून निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here