पुणे : श्री छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये उसाची उपलब्धता जास्त आहे. त्यातच पावसाच्या पडलेल्या खंडामुळे परिसरात हुमणीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ऊस उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. हुमणीचा जीवनक्रम सुरू होण्यास एप्रिल, मे मध्ये पडलेल्या पावसात सुरुवात केली होती. मात्र, सलग पाऊस झाल्याने हुमणीचा प्रादूर्भाव होणार नाही अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. प्रत्यक्षात कारखाना कार्यक्षेत्रात हुमणीचा अधिक फैलाव दिसून येत आहे.
सद्यस्थितीत छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांनी उत्पादित केलेले बीबीव्हीएम व ई. पी. एन हे औषधे कारखान्याच्या वतीने माफक दरात उपलब्ध आहेत, त्याचा लाभ सभासदांनी घ्यावा असे आवाहन कारखान्याचे व्यवस्थापन मंडळ व ऊस विकास अधिकारी प्रवीण कांबळे यांनी केले आहे. हुमणीचे जैविक व रासायनिक पद्धतीने नियंत्रण करणे गरजेचे आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास हुमणीची वाढ होऊन नियंत्रणास मर्यादा येतात. त्यामुळे वेळीच उपाय योजना करण्याचे आवाहन कारखान्याने केले आहे.