कोल्हापूर : जवळपास गेल्या १० महिन्यापासून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने तोडगा निघालेल्या १०० रूपयाच्या दुसऱ्या हप्त्याची वाट बघतोय. साखर कारखाने आठ महिन्यापूर्वी राज्य सरकारकडे मान्यतेसाठीचे प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र कारखानदारांच्या दबावास बळी पडून मुख्यमंत्री सदर प्रस्तावास मान्यता देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.
राजू शेट्टी म्हणाले कि, गुरुवारी मुख्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसले व त्यांच्या दबावास बळी पडून त्यांनी १०० रूपये प्रस्तावाची घोषणा केली नाही. दोन-दोन वर्षे कारखान्यांचा हिशोब राज्य सरकार कडून केले जात नाहीत. शेतकरी आपल्या घामाचे दाम मागतोय तर मुख्यमंत्री शिंदे व कारखानदार दोघेही ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका शेट्टी यांनी केली.
याबाबत ‘चीनीमंडी’शी बोलताना शेट्टी म्हणाले कि, सन २०२२-२३ या गळीत हंगामातील उसाला ठरल्यानुसार प्रती टन १०० रुपये व ५० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातत्याने लावून धरली आहे. हा दुसरा हप्ता मिळण्यासाठी गेल्या सात महिन्यांत मुख्यमंत्री शिंदे यांना पाचवेळा व मुख्य सचिव यांची सहावेळा भेट घेऊन वारंवार मागणी करूनही राज्य सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.