कोल्हापूर : येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मोलॅसिस विक्रीवरील बंदी हटवल्याने येत्या हंगामात कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्याचा मोलॅसिस विक्रीचा एम-१ परवाना निलंबित करण्याच्या दिलेल्या आदेशाला उत्पादन शुल्क आयुक्तांनी स्थगिती दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पावरील कारवाईला स्थगिती दिली होती.
उत्पादन शुल्क विभागाने २१ जून रोजी रात्री तपासणी करत कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पात काही त्रुटी दाखवल्या होत्या. चौकशी अहवालानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कारखान्याला इथेनॉलचे नव्याने उत्पादन करण्यास व असलेल्या साठ्याची विक्री करण्यास बंदी घातली होती. या निर्णयाविरुद्ध कारखाना प्रशासनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने याला अंतरिम स्थगिती दिल्याने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईला स्थगिती दिली. कारखान्याच्या वतीने अॅड. विनायक साळोखे यांनी काम पाहिले.
दरम्यान, याबाबत ‘चीनी मंडी’शी बोलताना बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले की, कारखान्यातील हंगामपूर्व कामे प्रगतिपथावर असून, यंदाचा हंगाम यशस्वी करण्यासोबतच विक्रमी ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कारखान्याच्या उपपदार्थ निर्मिती प्रकल्पातून अधिक आर्थिक सक्षमता प्राप्त करण्याचे उद्दिष्ट असून, या माध्यमातून ऊस उत्पादकांना चांगला दर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.