सातारा : महायुती सरकारमुळे दोन दिवसांपूर्वीच किसन वीर व खंडाळा कारखान्याच्या खात्यावर ४६७ कोटी रुपये जमा झालेले आहेत. या कर्जामधून थकीत ४५ कोटींची एफआरपी व गतवर्षीची थकीत १६ कोटींची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहेत. कारखाना ताब्यात घेतल्यानंतर किसन वीरला पुनरुज्जीवित केल्याचा सार्थ अभिमान वाटतो, असे प्रतिपादन आ. मकरंद पाटील यांनी केले. किसन वीर यांच्या जयंतीनिमित्त कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम, वाई तालुका सहकारी सूतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, राजेंद्र तांबे, नितीन भुरगुडे-पाटील, दत्तानाना ढमाळ आदी उपस्थित होते.
आ. मकरंद पाटील म्हणाले की, थकहमी मंजूर झाल्यानतंर बँकांची ओटीएस रक्कम कामगारांचा प्रॉव्हीडंट फंड, शासकीय देणी देणार आहोत. यामुळे आता कारखाना पूर्वपदावर येण्यास सुरुवात होणार आहे. जेवढे जास्त गाळप होईल तेवढे कारखान्यावरील कर्ज लवकरात लवकर फेडण्यास मदत होणार आहे. कारखाना ताब्यात घेतल्यानंतर शासनाकडून मदत मिळवून देईन हा शब्द मी व संचालक मंडळाने पूर्ण केलेला आहे. आता किसनवीर ७ लाख व खंडाळा कारखाना ३ लाख असे मिळून १० लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवलेले आहे. ते पू्र्ण करण्यास शेतकऱ्यांनी मदत करावी. प्रमोद शिंदे म्हणाले की, कोणतेही अर्थसहाय्य न घेता मागील दोन हंगाम यशस्वी केलेले असून या हंगामाची तयारीही अंतिम टप्प्यात आहे. संदीप चव्हाण, नितीन भरगुडे-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. संचालक दिलीप पिसाळ यांनी आभार मानले.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.