पुणे: वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) ही साखर उद्योगामधील राज्यातील १३३ खाजगी साखर कारखान्यांची अग्रगन्य शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. ‘विस्मा’तर्फे प्रथमच साखर हंगाम २०२३-२४ मध्ये सभासद कारखान्यांसाठी ऊस शेती विकास, साखर उत्पादन, उपपदार्थ उत्पादन, विकास, संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच आर्थिक बाबी या पाच विषयांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबध्दल पारितोषिक देवून सन्मानीत करण्यात येणार आहे. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी “सिध्दी साज गार्डन”, डी. पी. रोड, म्हात्रे पुलाजवळ, एरंडवणा, पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते पारितोषक वितरण समारंभ होणार आहे.
पारितोषक निवडीसाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली होती. त्यामध्ये हरीभाऊ बागडे (राज्यपाल, राज्यस्थान व निवड समितीचे अध्यक्ष), बी. बी. ठोंबरे (विस्मा-अध्यक्ष व सदस्य), आमदार रोहित पवार ( विस्मा-उपाध्यक्ष व सदस्य), एस. बी. भड (डिएसटीए-अध्यक्ष व सदस्य), डॉ. पांडूरंग राऊत (विस्मा-महासचिव व सदस्य), राजेश सुरवसे (संचालक-प्रशासन, साखर आयुक्तालय व सदस्य) आणि डॉ संजय पाटील (नामांकित तांत्रिक तज्ञ, सदस्य) यांचा समावेश होता. मान्यवर तज्ञ समितीने स्पर्धेकरीता सहभागी झालेल्या सभासद कारखान्यांनी विविध विषयावरील सादर केलेल्या अहवालांचे मूल्यांकन करून पाच पारितोषके जाहीर केली.
विस्मा पुरस्कार विजेते साखर कारखाने असे…
1) द्वारकाधीश साखर कारखाना लि. जिल्हा नाशिक (उत्कृष्ट ऊसाची शेती विकास/ Best Sugarcane Agriculture Development)
2) दालमिया भारत शुगर अॅण्ड इंडस्ट्रीज लि. कोल्हापूर (उत्कृष्ट साखर उत्पादन / Best Sugar Production)
3) श्री गुरूदत्त शुगर्स लि. जिल्हा-कोल्हापूर (उत्कृष्ट उपपदार्थ उत्पादन/ Best Co-products Production)
4) नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. धाराशिव (संशोधन, विकास आणि नाविन्यपूर्ण उपक्रम / Research, Development and Innovative Activities)
5) व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लि. जिल्हा-पुणे (उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन/ Best Finance Management)
पारितोषिक वितरण समारंभ भारत सरकारच्या नव व अपारंपारिक उर्जा विभागाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संगिता कस्तुरे, साखर आयुक्त, डॉ. कुणाल खेमनार व राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते होणार आहे. याबरोबरच ‘साखर उद्योगासाठी टिकाऊ हवाई इंधन (SAF) व कार्बन फुट प्रिंटसमधील संधी’ या विषयावर प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष यांचे सादरीकरण होणार आहे. डॉ. संगिता कस्तुरे या ‘बायोसिएनजी उत्पादन, संधी व शासकीय योजना’ याबाबत माहिती सादर करणार आहेत. पारितोषक वितरण व परिसंवाद समारंभ शनिवार, ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत ‘सिध्दी साज गार्डन”, म्हात्रे पुलाजवळ, एरंडवणा, पुणे येथे आयोजित केला आहे. तरी या कार्यक्रमास राज्यातील सर्व खाजगी व सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक व विभाग प्रमुखांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे व कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी केले आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.