छत्रपती संभाजीनगर : मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे यंदा मराठवाड्यात साखरेचे उत्पादन घटणार असल्याचे संकेत मिळत आहेत. छत्रपती संभाजीनगर मधील प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाने ही माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड हे मराठवाड्यातील, तर जळगाव, धुळे आणि नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयांतर्गत होतो. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सहा जिल्ह्यांतील साखर कारखान्यांमधून यंदा ८५ ते ९० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होईल. २०२३-२४ या वर्षात हे उत्पादन ९८ लाख ३३ हजार ४६२ मेट्रिक टन इतके झाले होते. २०२४-२५ या वर्षात ते घटेल अशी शक्यता आहे.
‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या विभागात २०२३-२४ या साली एकूण गाळप ९८ लाख ३३ हजार ४६२ मेट्रिक टन झाले होते व साखरेचे उत्पादन ८८ लाख २८ हजार ५४६ क्विंटल इतके झाले होते. यावर्षी या सहा जिल्ह्यांत २३ साखर कारखाने चालू होते. २०२४-२५ मध्ये पाऊस चांगला आहे. त्यामुळे पुढील कालावधीत उसाचे क्षेत्र वाढू शकेल, असा अंदाज आहे. उत्पादित झालेल्या उसापैकी २० टक्के ऊस गुहाळासाठी व अन्य भागातील कारखान्यांसाठी सुद्धा जातो. दरम्यान, यंदा उसाअभावी मुक्ताईनगर येथील साखर कारखाना सुरू होण्याची शक्यता नाही. मात्र, वैजापूर तालुक्यातील महालगावचा पंचगंगा कारखाना नव्याने सुरू होणार आहे. बीड जिल्ह्यातील राजुरी येथील कारखानाही सुरू होण्याची शक्यता कमी आहे.