कोल्हापुरी गुळाचे ब्रँडिंग केल्यास चांगला दर मिळवणे शक्य : डॉ. सुभाष घुले

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी पारंपरिक गूळ उत्पादनापासून थोडे बाजूला होऊन बाजारपेठेची गरज ओळखून गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्याची गरज आहे. बाजार समितीने कोल्हापुरी गुळासाठी ब्रँड अॅम्बेसिडर नेमून मार्केटिंग केले, तर दर चांगला मिळेल, असे प्रतिपादन राज्य कृषी पणन पुणे विभागीय कार्यालयाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बधवारी आयोजित केलेल्या गूळ उत्पादकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांच्या हस्ते उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी समितीचे सभापती अॅड. प्रकाश देसाई होते.

डॉ. घुले यांनी सांगितले की, कोल्हापुरी गुळाला चालना देण्यासाठी दीपावलीपूर्वी कोल्हापूरसह सांगली, पुणे व मुंबई येथे गूळ महोत्सव घेत असतानाच दोन महिन्यांत ‘खरेदी- उत्पादक’ मेळाव्याचे आयोजन केले जाईल. यात मुंबईतील निर्यातदार येऊन थेट शेतकऱ्यांशी संवाद साधतील. गेल्या सहा वर्षांत देशात ३४०० कोटींपर्यंत गुळाची निर्यात पोहचली आहे. कोल्हापुरी गुळाची चव वेगळी असल्याने निर्यातीसाठी खूप वाव आहे. यावेळी समितीचे संचालक सूर्यकांत पाटील, प्रा. डॉ. ए. एम. गुरव, डॉ. शर्वरी माने, ऊस व गूळ संशोधन केंद्राचे डॉ. बी. जी. गायकवाड, जिल्हा उद्योग केंद्राचे रवी साखरे यांनी मनोगत व्यक्त केले. उपसभापती सोनाली पाटील, सचिव जयवंत पाटील, संचालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here