लातूर : नॅचरल शुगर अँड अलाइडचे चेअरमन बी.बी. ठोंबरे यांच्या संकल्पनेतून सभासद आणि बिगर सभासद शेतकऱ्यांसाठी ऊस पिकाची ड्रोनद्वारे फवारणी करण्याची योजना राबविली जात आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर ड्रोनद्वारे फवारणीसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे. तांदुळजा येथील शेतकऱ्यांसाठी ड्रोनद्वारे ऊस फवारणीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. ऊस पिकाचे कीड रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन करून उसाची वाढ होण्यासाठी नॅचरल शुगरने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे.
ऊस पीक ८ ते १५ फूट उंचीचे झाले आहे. पाठीवर फवारणी पंप घेऊन शेतात फवारणी करणे शक्य नाही. ड्रोनद्वारे फवारणी केल्यामुळे विंचू, काटा, सापांची भीती दूर झाली आहे. असे धनंजय देशमुख यांनी सांगितले. पाठीवर पंप घेऊन औषध फवारणीसाठी सव्वातास वेळ लागतो. हेच काम ड्रोनद्वारे सात ते आठ मिनिटांमध्ये पूर्ण होते. त्यामुळे खर्चामध्ये बचत झाली असे पिंपळगावचे सरपंच भैरवनाथ पिसाळ यांनी सांगितले. यावेळी ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांनी ड्रोन फवारणी करीत मार्गदर्शन केले. यावेळी रमेश जाधव, नॅचरलचे कृषी पर्यवेक्षक हनुमंत पालकर, कृषी सहायक शिवदास फुटाणे, मेघनाथ माळी, शेतकरी शामराव जाधव, गोविंद जाधव, धनराज पवार, अशोक जाधव, बापूसाहेब बिडवे, अशोक बिडवे, तुकाराम बिडवे, सिद्धेश्वर पिसाळ आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.