पुणे : केंद्र सरकारने गेल्या दहा महिन्यांपासून उसाचा रस, साखरेचा पाक आणि बी हेवी मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचे खरेदी दर वाढविलेले नाहीत. जर दरात वाढ झाली तर साखर कारखान्यांना साखरेचे उत्पादन घ्यायचे की इथेनॉल उत्पादन करायचे, हे निश्चित करता येईल. त्यामुळे केंद्राने इथेनॉल खरेदी दरात तातडीने वाढ जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली. किमान साखर विक्री घराचा आहे. त्याचाही समाधानकारक निर्णय होण्यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ प्रयत्नशील आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
अध्यक्ष हर्षवर्धन पाटील म्हणाले की,देशभरातील सर्व आसवांनी प्रकल्पांना नवीन हंगाम २०२४-२५ मध्ये उसाचा रस, साखरेचा पाक व बी हेवी मोलॅसिससह सर्वच कच्च्या मालापासून इथेनॉलची निर्मिती करण्याची मुभा देण्यात आली आहे. जुलैअखेर देशभरात १ हजार ५९० कोटी लिटर उत्पादन क्षमता तयार झालेली असून, तेल कंपन्यांकडून फक्त ५०५ कोटी लिटर इथेनॉलची खरेदी वर्ष २०२३-२४ मध्ये झाली आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचे प्रमा १३.३ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. हे प्रमाण २०२५-२६ अखेर २० टक्क्यांपर्यंत नेण्याचे केंद्र शासनाचे ध्येय आहे. त्या दृष्टीने इथेनॉल उत्पादनवाढीसाठी, साखरेचा वापर वळवण्यासाठी आणि या दोन्हींतून कारखान्यांचे आर्थिक चक्र सुधारण्यात मोठी मदत होणार असल्याचे पाटील म्हणाले. दरम्यान, केंद्राने मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा खरेदी दर रु. ७१.८६ प्रतिलिटर अशा सर्वोच्च पातळीवर निश्चित केला आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले.