कोल्हापूर : गेली काही वर्षे देशातील साखर उद्योग अडचणीतून जात होता.त्यावेळी या उद्योगातील अनेक प्रस्थापित मंडळींनी धाडसी निर्णय घेण्याचे टाळले होते.भारतीय साखर उद्योग स्वत:ला सावरण्यासाठी धडपडत होता.अशा कठीण काळात मानसिंग खोराटे यांनी साखर उद्योगात पाऊल टाकले आणि अल्पावधीतच आपल्या दूरदर्शी नेतृत्वाने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले.खोराटे यांनी 2019 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात बंद पडलेल्या दौलत सहकारी साखर कारखान्याची सूत्रे हाती घेतली.तो यशस्वीपणे चालविला.त्यानंतर खोराटे यांच्या अथर्व इंटरट्रेड ग्रुपने नोव्हेंबर 2023 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील लोकशक्ती शुगर्सची मालकी मिळवली.साखर कारखानदारीत आपल्या कर्तबगारीने वेगळी छाप सोडणारे मानसिंग खोराटे आता विधानसभेचे मैदान मारण्यासाठी सज्ज झाले आहेत.चंदगड विधानसभा मतदार संघातून आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
आजरा तालुक्यातील हालेवाडी गावचे सुपुत्र असणाऱ्या खोराटे यांनी गोव्यात इंग्रजी माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेतले.केमिकल इंजिनिअरिंग पदवीधारक असणाऱ्या खोराटे यांनी काही काळ घोडावत ग्रुपमध्ये नोकरी केली.त्यानंतर अथर्व शुगर कंपनीची मुहूर्तमेढ रोवत अल्पावधीत साखर निर्यातीचा मोठा व्यवसाय उभा केला.खोराटे यांचे वडील मुंबईत गिरणी कामगार होते.अत्यंत सामान्य घरातून आलेल्या खोराटे यांनी बंद स्थितीतील दौलत कारखाना सुरळीत चालवून दाखवत चंदगड तालुक्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्याचबरोबर शेकडो तरुणांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून दिल्या. त्याचा फायदा त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.
लढत तिरंगी होणार कि चौरंगी याकडे लक्ष
चंदगड विधानसभा मतदारसंघाचे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश पाटील हे नेतृत्व करीत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत शिवाजी पाटील यांनी ५१ हजार १७३, तर विनायक उर्फ विरगोंदा पाटील यांनी वंचित बहुजन आघाडी मार्फत ४३ हजार ९७३ मते घेतली होती.संग्रामसिंह कुपेकर देखील मैदानात होते. मात्र खरी लढत राजेश पाटील, शिवाजी पाटील आणि अप्पी पाटील यांच्यात झाली होती. अप्पी पाटील हे सध्या कॉंग्रेसमध्ये आहेत. आगामी निवडणुकीत या तिघा बरोबरच स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाभुळकर पण निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. सध्या तरी मानसिंग खोराटे अपक्ष लढण्याच्या मानसिकतेत दिसून येत आहेत. त्यामुळे निवडणूक तिरंगी होणार कि चौरंगी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.