पुणे : सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रात हुमणी, गोगलगायीमुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान

पुणे : सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात निंबुत, खंडोबाची वाडी, गरदडवाडी, सोमेश्वर वाणेवाडी, मुरूम या परिसरातील शेतकऱ्यांचे ऊस, आले, बाजरी, मिरची, वांगी, इत्यादी पीक हुमणी रोगामुळे जागेवरच करपू लागले आहे. लाखो रुपये खर्च करून आलेले पीक हुमणीमुळे अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे. तर बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात ऊस, आले, बाजरी पिकाला मोठ्या प्रमाणात गोगलगायींचाही प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

लाखो रुपयांचा खर्च करून लागवड केलेल्या उसासह खोडवा, बाजरी, आले पीकही हुमणी, गोगलगायीमुळे संपुष्टात आले आहे. हजारो रुपयांच्या औषधांच्या फवारण्या करूनसुद्धा हुमणी, गोगलगायी आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गोगलगायी आणि हुमणीने ऊस खाल्ल्यामुळे आता तो जनावरांना खाद्य म्हणून वापरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दरम्यान, हुमणी कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे वडगाव निंबाळकर येथील मंडल कृषी अधिकारी हिंदूराव मोरे यांनी सांगितले. ते म्हणाले की, हुमणी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी हुमणी सापळे लावावे. जैविक कीड नियंत्रणासाठी मेटा राइझम बुरशीची दोन लीटर प्रति एकर २०० लीटर पाण्यामधून आळवणी करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here