मुंबई : महाराष्ट्रात आगामी वर्षभरात ‘मेड इन इंडिया’ तंत्रज्ञानावर आधारित बांबूपासून इथेनॉलची निर्मिती सुरू केली जाणार आहे. राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी ही माहिती दिली. इंधनाच्या वाढत्या किमतीला पर्याय म्हणून आता इथेनॉलकडे पाहिले जाते. त्या उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून बांबूकडे पाहिले जाते. बांबूपासून इथेनॉल तयार करणारी रिफायनरी आसाममधील गुवाहाटी येथे येत्या पंधरा दिवसांत सुरू होत आहे. आसाममध्ये नेदरलँड, फिनलँड आणि केंद्र सरकारच्यावतीने पाच लाख टनांपासून दोन कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचा प्रयोग होणार आहे. महाराष्ट्रात २१ लाख हेक्टरवर बांबू लागवडीचा निर्णय घेतला आहे. असे पटेल यांनी सांगितले.
पाशा पटेल यांनी सांगितले की, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश वगळता इतर राज्यांत उसाची शेती कुठेच होत नाही. जेथे पाणी आहे तेथेच ऊस पिकतो. परंतु, जगाला इथेनॉल द्यायचे झाल्यास त्याला बांबूशिवाय पर्याय नाही. बांबूची सर्वच राज्यांत निर्मिती होते. एक हेक्टरवरील उसाच्या शेतीला दोन कोटी लिटर पाण्याची गरज लागते; एक हेक्टरवर बांबू लावले तर वीस लाख लिटर पाणी लागते. एक टन उसापासून ८० लिटर रस निघतो, तर एक टन बांबू गाळला तर २०० लिटर इथेनॉल मिळते. त्यामुळे बांबूपासून इथेनॉल करणे फायद्याचे आहे, असे पटेल यांनी सांगितले. बांबू लागवडीला प्रोत्साहनाबाबत महायुती सरकारचे कौतुक करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बांबू विकचे औचित्य साधून १८ सप्टेंबर रोजी मुंबईतील एका कार्यक्रमात वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा सत्कार केला जाणार आहे.
इथेनॉल इंडस्ट्रीच्या अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.