नाशिक : कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव, चांदवड या तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या विठेवाडी (ता. देवळा) येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे (वसाका) पुनरुज्जीवन करण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. त्यामुळे ‘वसाका’ची विक्री होऊ न देता कामगार व ऊस उत्पादकांचे हित लक्षात घेऊन आगामी काळात कारखाना भाडे करारानेच चालविण्यात येईल, असा निर्णय मुंबईत उपमुख्यमंत्री पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली.
चांदवडचे आमदार राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखालील वसाका कर्मचारी युनियनच्या सदस्यांनी गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेला वसाका कारखाना पुन्हा सुरू करावा या संदर्भात चर्चा करण्यासाठी मंत्रालयात पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, शिखर बँकेचे अधिकारी विद्याधर अनासकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळा तालुकाध्यक्ष पंडित निकम, वसाका कामगार युनियन यांचे विलास देवरे, सुनील देवरे, हिरामण बिरारी, विलास सोनवणे, आनंदा देवरे, रवींद्र सावरकर, नंदू माधव, सतीश शिरोडे, नाना देवरे, आदींसह सहकार व वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव म्हणाले की, कसमादे परिसरातील २८ हजार सभासदांच्या मालकीचा व ७०० कामगारांची रोजीरोटी असलेल्या कारखान्याला गतवैभव प्राप्त व्हावे अशी इच्छा आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.