पुणे : आगामी गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये ऊस पिकाचे एक कोटी ४९ लाख १६ हजार २९७ टन इतके गाळप अपेक्षित आहे. जिल्ह्यात पाण्याच्या उपलब्धतेमुळे ऊस पिकाची स्थिती सध्यातरी समाधानकारक आहे. त्यामुळे गतवर्षापेक्षा यंदा १५ लाख टनांनी ऊस गाळप वाढण्याचा प्राथमिक अंदाज पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातून वर्तविण्यात येत आहे. गेल्यावर्षी हंगाम २०२३-२४ मध्ये एक कोटी ३४ लाख ९७० टन इतके ऊस गाळप पूर्ण झाले होते. यावर्षी दुष्काळाची स्थिती असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ऊस उपलब्धता वाढत असल्याचा अहवाल तयार झालेला आहे. त्यामुळे साखर उद्योगाला दिलासा मिळेल असे चित्र दिसते.
‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, साखर आयुक्तालयाने कृषी विभागाकडून प्राप्त झालेली माहिती आणि साखर कारखान्यांची बैठक बोलावून घेतलेली आकडेवारी यातून अपेक्षित ऊस उपलब्धतेचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यात आगामी २०२४-२५ च्या हंगामात दौंड शुगर आणि बारामती अॅग्रो या दोन्ही खासगी साखर कारखान्यांकडून प्रत्येकी सुमारे २० लाख टन उसाचे गाळप अपेक्षित आहे. त्याखालोखाल भीमाशंकर सहकारीकडून १३.९८ लाख टन, माळेगाव सहकारी १२ लाख टन, श्री विघ्नहर सहकारी कडून ११.५१ लाख टन, श्री सोमेश्वर सहकारी ११.२३ लाख टन, तर भीमा पाटस सहकारीकडून सुमारे १० लाख टन उसाचे गाळप अपेक्षित आहे. जिल्ह्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे ऊस पिकाला उन्हाळी हंगामात फायदा झाला आहे. शिवाय मान्सूनच्या पावसानेही जोरदार हजेरी लावल्यामुळे उसाचे पीक जोमात येण्यास मदत झाल्याचे सांगण्यात आले. गतवर्षाच्या तुलनेत यंदा ऊस उपलब्धता वाढणाऱ्या कारखान्यांमध्ये प्रामुख्याने श्री विघ्नहर सहकारी, भीमा पाटस सहकारी (श्री साईप्रिया शुगर प्रा. लि.), भीमाशंकर सहकारी आदी कारखान्यांचा समावेश आहे.