कोल्हापूर : आसुर्ले पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त-दालमिया साखर कारखान्याच्या वतीने कार्यक्षेत्रातील पूरबाधित क्षेत्रांना भेटी देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पुनाळ, यवलूज, कोतोली, कळे, साळवण, आसुर्ले येथील पूरबाधित ऊस क्षेत्राला प्रत्यक्ष भेट देऊन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शेती शास्त्रज्ञ डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. गणेश कोटगिरे, दालमियाचे ऊस विकास अधिकारी संग्राम पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पूर परिस्थितीमुळे नदीकाठच्या शेतीतील ऊस पिकावर परिणाम होऊ लागल्याने नुकसानीचे प्रमाण वाढू लागले आहे. पुरातून बचावलेल्या ऊस पिकांवर काय उपाययोजना केल्यानंतर ऊस उत्पादनात वाढ होऊ शकते, यासंदर्भात माहिती देण्यात आली.
शेतकऱ्यांना कीड, बुरशीनाशक फवारणीबरोबर संतुलित खतांचा वापर केल्यानंतर त्वरित हलकी भरणी करून महिन्याने तुटाळ भरावी असे आवाहन करण्यात आले. पुराच्या पाण्यात को-८६०३२ ऊस जास्त काळ टिकून राहतो. शिवाय रोगप्रतिकारशक्ती जास्त असल्याने नुकसान होत नसल्याने त्याचा वापर अधिक करावा असा सल्ला देण्यात आला. पोक्का बोंग, तपकीर ठिपके रोग नियंत्रणासाठी ०.३ टक्के मॅन्कोझेब (डीएथेन एम ४५) या बुरशीनाशकाची फवारणी करावी, अंशतः वाळलेल्या ऊस पिकाचा खोडवा घेण्यासाठी जमिनीलगत छाटणी करून खोडवा मशागत करावी आदी उपाययोजना शेतकऱ्यांना शेती तज्ज्ञांनी सुचवल्या. मॅनेजर (केन) शिवप्रसाद देसाई, नितीन कुरुळुपे, प्रसाद मिरजकर, शिवाजी चौगुले, विष्णू गुरवळ आदी उपस्थित होते.