पुणे : राज्यातील साखर कारखान्यांमध्ये उत्पादित होत असलेल्या प्रेसमडचे प्रमाण आणि किलोला मिळणारा ७० रुपये असा हमीभाव लक्षात घेता एक लाख ७२ हजार टन कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) निर्माण करण्याची क्षमता आहे. साखर कारखान्यांना यातून बाराशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे कारखान्यांनी प्रेसमडपासूनचे बायोगॅस प्रकल्प उभारावेत, अशा मार्गदर्शक सूचना साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी केल्या आहेत. याबाबतच्या परिपत्रकात त्यांनी साखर कारखान्यांनी प्रेसमडपासून बायोगॅस निर्मिती केल्यास अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल, असे सूचवले आहे.
राज्यात २१० साखर कारखान्यांनी गतवर्ष २०२३-२४ मध्ये १०७६ लाख मे. टन उसाचे गाळप करून ११० लाख मे. टन साखर उत्पादन केले. एक मेट्रिक टन उसाचे गाळप केल्यास सुमारे ४० किलो (४ टक्के) प्रेसमड तयार होतो. यानुसार २०२३ – २४ च्या गाळप हंगामात सुमारे ४३ लाख मेट्रिक टन प्रेसमड (४ टक्के) तयार झालेला आहे. बायोगॅसनिर्मिती हा एक शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जास्रोत आहे. देशाच्या कच्च्या तेलाची आयात करावी लागते. त्या पार्श्वभूमीवर प्रेसमडपासून बायोगॅस उत्पादन आणि त्याचे फायदे घेता येणे साखर कारखान्यांना शक्य आहे. यातून कारखान्यांना अतिरिक्त उत्पन्न कसे मिळू शकते याविषयी खेमनार यांनी विस्तृत मार्गदर्शन केले आहे. बायोगॅस निर्मितीतील आव्हाने, विक्री व्यवस्था, वित्तीय योजना व वित्तीय साहाय्य कोणाकडून उपलब्ध होत आहे, याची माहितीही परिपत्रकात दिली आहे.