नवी दिल्ली : भारतामध्ये इथेनॉल उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय वाढ होत आहे. त्यामुळे देशाच्या एकूण उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. अन्न तथा सार्वजनिक वितरण विभागाच्या (DFPD) म्हणण्यानुसार, भारताची इथेनॉल उत्पादन क्षमता १०२७-१८ मधील ५१८ कोटी लिटरवरून वाढून २०२३-२४ मध्ये (३१ ऑगष्ट २०२४ अखेर) १,६२३ कोटी लिटर झाली आहे. यातून सरकारची हरित भविष्याकडील वाटचाल दिसून येते. सरकार देशभरात पेट्रोलसोबत, इथेनॉल मिश्रित(ईबीपी) कार्यक्रम लागू करीत आहे. त्याअंतर्गत इंधन वितरण कंपन्या (ओएमसी) इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री करतात. सरकारने या कार्यक्रमांतर्गत २०२५ पर्यंत पेट्रोलसोबत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
अलिकडेच सरकारने इथेनॉल पुरवठा वर्ष (ईएसवाय) २०२४-२५ साठी साखर कारखाने आणि डिस्टिलरींना उसाचा रस, साखरेचे सिरप, बी-हेवी मोलॅसिस आणि सी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीची परवानगी दिली आहे. याशिवाय, सरकारने आधीचे निर्बंध हटवले आहेत. आणि भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) च्या साठ्यातील २३ लाख टन तांदूळ धान्यावर आधारित इथेनॉल डिस्टिलरींना विक्रीची परवानगी दिली आहे. यामुळे इथेनॉल उत्पादनात उल्लेखनीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, वाढती क्षमता देशांतर्गत इथेनॉलच्या गरजा पूर्ण करेल. एकूण २० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जवळपास १,०१६ कोटी लिटर इथेनॉलची गरज भासेल. जो इतर वापर लक्षात ठेवून एकूण १,३५० कोटी लिटर असेल. प्लांट ८० टक्के कार्यक्षमतेवर सुरू असतात हे लक्षाक घेता २०२५ पर्यंत, १,७०० कोटी लिटर इथेनॉल उत्पादन क्षमतेची गरज भासेल. या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर २०२३ पासून जुलै २०२४ पर्यंत संचयी इथेनॉल मिश्रण १३.३ टक्के असेल.