सोलापूर : होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी नागरी विमानसेवा महासंचालक कार्यालय (डीजीसीए) चे अधिकारी सोलापुरात दाखल झाले आहेत. मात्र, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीनंतर आता परिसरातील तीन एकर जागेवरून तणाव निर्माण झाला आहे. शुक्रवारी दुपारी जिल्हा प्रशासनाने या जागेचा ताबा घेतला. ही जागा होटगी रोड विमानतळाची असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, कारखान्याच्या संचालकांनी ही कार्यवाही बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचा आरोप केला. याबाबत घटनास्थळी कारखाना प्रशासन आणि महसूल अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष झाल्याने मोठा गोंधळ उडाला.
‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी तहसीलदार निलेश पाटील, एअरपोर्ट एथॉरिटीचे व्यवस्थापक बनोथ चांपला शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमाराला कारखाना परिसरात पोहोचले. कारखान्याचे प्रमुख धर्मराज काडादी, चेअरमन पुष्पराज काडादी, उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, कार्यकारी संचालक समीर सलगर, संचालक अमर पाटील यांनी या कार्यवाहीला विरोध केला. काडादींनी न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचे सांगितले. बराच वेळ वाद झाला. अखेर तहसीलदारांनी जागेचा ताबा घेतल्याचे जाहीर केले. तत्पुर्वी सकाळी दहा वाजता कारखान्याच्या सुरक्षा रक्षकांनी कारखाना, सिद्धेश्वर शाळेकडे येणारे रस्ते अडवले. कारखान्याचे संचालक, अधिकारी शाळेजवळ ठाण मांडून होते. त्यामुळे तहसीलदार, एअरपोर्ट अधिक विमानतळाच्या आतून गेट उघडून यावे लागले. दरम्यान, सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी म्हणाले की, विमानतळ प्राधिकरणाने ५० वर्षांपूर्वी तारेचे कंपाउंड मारून जागा निश्चित केली. हे कंपाउंड सोडून कारखान्याची अडीत ते तीन एकर जागा बळकावण्याचे काम जिल्हा प्रशासन आणि एअरपोर्ट अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी केले.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.