नांदेड विभागात यंदा ९०.२८ लाख टन ऊस गाळप होण्याचा अंदाज

नांदेड : विभागात झालेल्या सध्याच्या पुरेशा पावसाने उसाच्या वजनात वाढ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत उसाचे लागवड क्षेत्र घटले, तरी ९०.२८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होण्याची शक्यता प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने वर्तवली आहे. विभागात मागील वर्षी, २०२३-२४ मध्ये ऊस लागवडीचे क्षेत्र एक लाख ६६ हजार ८५५ हेक्टर होते. यंदा हे क्षेत्र एक लाख २५ हजार ४८५ हेक्टर आहे. यात ४१ हजार ३७० हेक्टरने घट झाली आहे.

‘अॅग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, नांदेड विभागात नांदेडसह हिंगोली, परभणी व लातूर या चार जिल्ह्यांचा समावेश होतो. चार जिल्ह्यातील २९ ते ३१ साखर कारखाने गाळप हंगाम सुरू करतात. गेल्यावर्षी नांदेड जिल्हा सोडला, तर, इतर जिल्ह्यांत पावसाने ओढ दिल्यामुळे सर्वच पिकांना फटका बसला होता. उसाचे वजन घटले होते. त्यामुळे सरासरी १० ते १५ टक्के उत्पादन घटणार अशी शक्यता प्रादेशिक साखर सहसंचालकांकडून वर्तविण्यात आली होती. परंतु आता स्थिती चांगली आहे. क्षेत्र घटल्याचा फारसा परिणाम झालेला नाही. विभागातील एकूण गाळप ९०.२८ लाख मेट्रिक टन इतके होईल, असे साखर विभागाकडून सांगण्यात येत आहे. प्रादेशिक सहसंचालक सचिन रावल म्हणाले की, यावर्षी साखर उत्पादनावर थोडासा परिणाम होईल. विशेषतः विभागातील लातूर, परभणीत घट होईल. नांदेड, हिंगोलीला उत्पादन चांगले राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here