कोल्हापूर : ऊस तोडणी वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक राज्य साखर संचालक सी. बी. पाटील यांच्या उपस्थितीत जयसिंगपूर येथील स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी कर्नाटकातील साखर कारखान्यांनी तोडणी व वाहतुकीचा दर महाराष्ट्राप्रमाणे द्यावा तसेच ऊस वाहतूकदारांची फसवणूक केलेल्या मुकादमांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेट्टी यांनी केली. त्यास पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बैठकीस स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेचे संदीप राजोबा, राजू पाटील, रावसाहेब अबदान, प्रवीण शेट्टी, दादा पाटील आदी उपस्थित होते.
कर्नाटकातील साखर कारखाने ऊस वाहतूकदारांना मध्यस्थीने ऊसतोडणी मुकादमांना अॅडव्हान्स दिले आहेत. ऊस वाहतूकदारांची फसवणूक केलेल्या मुकादमांवर ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, त्याचप्रमाणे कर्नाटकातही कारखानदार व वाहतूकदार यांच्यावतीने संबंधित मुकादमांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी कर्नाटक राज्याचे साखरमंत्री शिवानंद पाटील यांना स्वाभिमानी ऊसतोडणी वाहतूक संघटनेने विविध मागण्यांसाठी निवेदन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी साखर संचालक सी. बी. पाटील यांना तातडीने बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली.