कोल्हापूर : राज्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना सव्वानऊ टक्के रिकव्हरी असताना जर ३५०० रुपये दर जाहीर करत असेल, तर कुंभी -कासारी साखर कारखान्याची रिकव्हरी जवळजवळ तेरा टक्के असल्याने कारखान्याकडून सभासदांना प्रती टन ४५०० रुपये दर देणे शक्य आहे. कारखान्याने गत गळीत हंगामातील रक्कम द्यावी, अशी मागणी कुंभी- कासारी परिसरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. संघटनेचे अध्यक्ष बाजीराव देवाळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कारखाना प्रशासनाला याबाबत निवेदन दिले.
कॅप्टन उत्तम पाटील – शिंगणापूरकर यांनी कारखाना प्रशासनासमोर ऊस दराचे गणित मांडले. शाहू आघाडीचे राजेंद्र सूर्यवंशी, टी. एल. पाटील, सुभाष पाटील, सज्जन पाटील यांची प्रमुख उपस्थित होते. कारखान्याचे कार्यकारी संचालक धिरजकुमार माने, व्हा. चेअरमन राहुल खाडे, संचालक अॅड. बाजीराव शेलार, विलास पाटील, किशोर पाटील यांनी मागणीचे निवेदन स्वीकारले. गुणाजी शेलार, ज्ञानदेव पाटील, पांडूरंग शिंदे, सुनील कापडे, रंगराव पाटील, विष्णू राऊत, बाबासो पलसकर आदींसह स्वाभिमानी, शरद जोशी, रघुनाथदादा पाटील, आझाद हिंद क्रांती, संघटना, राजर्षी शाहू आघाडीचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.