कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या धर्तीवर कर्नाटक राज्य सरकारने ऊस तोडणी महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली. यावेळी कर्नाटक राज्य साखर संचालक सी. बी. पाटील उपस्थित होते. स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेने कर्नाटकचे साखरमंत्री शिवानंद पाटील यांना विविध मागण्यांसाठी निवेदन दिले होते. याबाबत जयसिंगपूर येथे राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली व सी. बी. पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
शेट्टी यांनी कर्नाटकातील वाहतूकदार शेतकरी व ऊस तोडणी मजूर यांच्या प्रश्नांसंदर्भात विविध सूचना केल्या. कर्नाटकातील साखर कारखान्यांनी महाराष्ट्र राज्याप्रमाणे तोडणी व वाहतूक दर द्यावा, ऊस वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर गुन्हे दाखल करावेत, आदी मागण्या करण्यात आल्या. याबाबत कर्नाटकच्यावतीने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी यांची तातडीने बेंगळुरू येथे मंत्रालयात बैठक घेण्यासाठी सकारात्मकता दर्शविली. संदीप राजोबा, राजू पाटील, रावसाहेब अबदान, प्रवीण शेट्टी, दादा पाटील आदी बैठकीस उपस्थित होते.