कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात यंदा गेल्यावर्षीपेक्षा उसाच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे. यंदा मान्सून वेळेवर सुरु झाला. त्यात महापुरामुळे फारसा फटका बसलेला दिसत नसल्याने उसाची वाढ चांगली आहे. साधारणतः १ लाख ८६ हजार ९०५ हेक्टर उसाची नोंद कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडे झाली आहे. सरासरी हेक्टरी ७५ टन उत्पादनानुसार १ कोटी ४० लाख टन तर सांगली जिल्ह्यात १ लाख ३७ हजार १०३ हेक्टरवरील उसाची नोंद असून, त्यांचा सरासरी हेक्टरी उतारा ८३ टन असून, त्यांच्याकडे १ कोटी १४ लाख ५५ हजार टन उसाची उपलब्धता आहे.
दोन्ही जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडील ऊस नोंद पाहिली तर एकूण २ कोटी ५४ लाख टन गाळप होईल असा अंदाज आहे. यंदा शेजारील कर्नाटकमध्ये उसाची उपलब्ध कमी असल्याने कर्नाटक सरकारने १५ नोव्हेंबरनंतर हंगाम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचाही फायदा कोल्हापूर विभागातील ऊस गाळपास होईल. सद्यस्थितीत राज्य सरकारने १५ ऑक्टोबरपासून गाळपाला परवानगी दिली तरी दीपावली आणि त्यानंतर विधानसभेचे मतदान पाहिले तर हंगाम १५ नोव्हेंबर नंतरच गती घेईल असे सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या हंगामात कोल्हापूर विभागातील ४० सहकारी व खासगी कारखान्यांनी २ कोटी ४० लाखांपर्यंत उसाचे गाळप केले होते. यंदा त्यापेक्षा जादा गाळप होवू शकते.