भोपाळ : मध्य प्रदेश बांबू संसाधनांमध्ये देशभरातील सर्व राज्यांना मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे आणि देशातील एकूण अंदाजित 15.0 दशलक्ष हेक्टर क्षेत्रापैकी एकट्या मध्य प्रदेशमध्ये 1.84 दशलक्ष हेक्टर इतके बांबूचे क्षेत्र आहे. अलीकडील भारतीय वन सर्वेक्षण अहवाल (IFSR) 2021 नुसार, मध्य प्रदेशात सर्वाधिक 18,394 चौरस किलोमीटरचे बांबू असलेले क्षेत्र आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेश (15,739 वर्ग किमी), महाराष्ट्र (13,526 चौरस किमी) आणि ओडिशा (11,199 चौरस किमी) यांचा नंबर लागतो. देशात अंदाजे बांबूचे एकूण क्षेत्रफळ १,४९,४४३ चौरस किलोमीटर इतके आहे. याशिवाय, मध्य प्रदेशात शुद्ध बांबू क्षेत्र 847 चौरस किलोमीटर, घनदाट क्षेत्र 4046 चौरस किलोमीटर, विरळ क्षेत्र 8327 चौरस किलोमीटर आणि पुनरुत्पादन 3,245 चौरस किलोमीटर आहे, जे देशात सर्वाधिक आहे.
बांबू मिशन योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशात बांबू लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. बांबूवर आधारित उद्योग विकसित केले जात आहेत, जेणेकरून येथे रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करता येतील. राज्यात बांबू लागवडीत नवीन तंत्रे आणि तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे, असे अधिकृत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.याव्यतिरिक्त, बांबू आधारित उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. राज्यात 25,090 हेक्टर शेती क्षेत्रात बांबू लागवड करण्यात आली आहे.
शिवाय, शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी बांबू मिशन योजनेअंतर्गत कृषी क्षेत्रात प्रोत्साहन देण्यात आले आहे. राज्यात एकूण 25,090 हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात आली असून, त्यात राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत 14,670 शेतकऱ्यांना वृक्षारोपण अनुदानही दिले आहे. शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात बांबू लागवडीसाठी प्रति रोप 120 रुपये अनुदान दिले जाते, जे 3 वर्षात 50:30:20 या प्रमाणात दिले जाते. बांबूच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत असून पर्यावरण संरक्षण आणि वनस्पती वाढीसाठी बांबूच्या भूमिकेला चालना दिली जात आहे. यासोबतच, खाजगी क्षेत्रातील बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी 25 ते 50 टक्के अनुदानाची तरतूद आहे, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.