महाराष्ट्र : राज्याच्या गाळप हंगामाची तारीख सोमवारी मंत्री समितीच्या बैठकीत ठरणार

पुणे : कर्नाटकने १५ नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातील गाळप हंगाम कधी सुरु होणार, याकडे साखर उद्योग जगताचे लक्ष लागले आहे. याबाबतचा निर्णय सोमवारी होणाऱ्या मंत्री समितीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. राज्यातील मागील वर्ष २०२३-२४ च्या ऊस गाळप हंगामाचा आढावा आणि यंदाच्या २०२४-२५ च्या गाळप हंगामाचे धोरण ठरविण्यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक सोमवारी (दि. २३) मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात दुपारी चार वाजता बोलाविण्यात आली आहे. त्यामध्ये यंदाचा हंगाम १ नोव्हेंबर किंवा १५ नोव्हेंबरपासून सुरू करायचा, यावर शिक्कामोर्तब होईल.

राज्यात २०२३-२४ चा हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला होता, तर यंदाचा २०२४-२५ चा हंगाम १ किंवा १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यावर निर्णय अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या प्रतिटन दहा रुपयांप्रमाणे करण्यात येणाऱ्या कपातीचा मुद्दा प्राधान्याने चर्चेत येईल. साखर कारखान्यांकडून या महामंडळासाठीचे अद्याप १५८ कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम दिल्याशिवाय साखर कारखान्यांना यंदाचा ऊस गाळप परवाना देण्यात येऊ नये, असा निर्णय बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे.बैठकीस कृषिमंत्री धनंजय मुंडे व अन्य मंत्री, संबंधित विभागाचे सचिव, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्यासह राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आदींसह साखर उद्योगाशी संबंधित मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रतिटन ३१५१ ते ३४०० रुपयांपर्यंत ऊस दर

केंद्र सरकारने हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप होणाऱ्या उसासाठी उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) ही १०.२५ टक्के बेसिक साखर उता-यासाठी प्रति टन ३४०० रुपये निश्चित केलेली आहे. १०.२५ टक्क्यांच्या पुढे ०.१ टक्का उता-यासाठी प्रतिटन ३३.२० रुपये आणि १०.२५ टक्क्यापेक्षा कमी आणि ९.५० टक्क्यापेक्षा जास्त उतारा असेल, तर ०.१ टक्क्यासाठी ३३,२० रुपये प्रतिटन असा दर आहे. तर, ९.५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी उत्तारा असल्यास प्रति मेट्रिक टन ३१५१ रुपये दर जाहीर केलेला आहे.

कृषी विभागाच्या अंदाजानुसार ९२ ते १०४ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित

कृषी विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यात प्रत्यक्ष गाळपासाठी ९०४ लाख टन ऊस उपलब्ध होऊन १०.२३ टक्के सरासरी उताऱ्यानुसार राज्यात यंदा ९२ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. तर, साखर आयुक्तालयाने मिटकॉन संस्थेकडून घेतलेल्या अहवालानुसार प्रत्यक्षात १०१३ लाख टन ऊस गाळप होऊन १०.२३ टक्के सरासरी उत्ताऱ्याानुसार १०४ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तविलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here