बँकॉक : थायलंडच्या गुंतवणूकदारांचा एक समुह श्रीलंकेतील तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ४ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे, असे डीजी एंटप्राइज कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष डमरोंग थेरामोके यांनी सांगितले. ‘डेली न्यूज बिझनेस’ला त्यांनी सांगितले की, या तीन प्रकल्पांमध्ये सौर ऊर्जा निर्मिती, श्रीलंकेला इंधन पुरवठा आणि साखर कारखान्यांचे बांधकाम यांचा समावेश आहे. ते म्हणाले की, आम्ही गुंतवणूक मंडळाशी अनेक चर्चा केल्या आहेत आणि ते हे प्रकल्प पुढे नेण्यास उत्सुक आहेत. आम्ही राजकीय स्थैर्य तसेच सध्याच्या आर्थिक धोरणांच्या सातत्याचा शोध घेत आहोत. एकदा या बाबींची खात्री पटली की ते प्रकल्प सुरू करण्यासाठी श्रीलंकेत त्यांचे पैसे गुंतवतील.
थेरामोके म्हणाले की, त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक ४०० मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती सुविधेचे बांधकाम असेल, ज्यासाठी ते योग्य जमीन शोधत आहेत. यासाठी सुमारे २ अब्ज अमेरिकन डॉलक गुंतवणूक करण्यास तयार आहेत. आमच्याकडे असा एक गुंतवणूकदार आहे, ज्याला श्रीलंकेतील शेतीच्या क्षेत्रात अनेक साखर कारखान्यांची स्थापना करण्यास स्वारस्य आहे असेही त्यांनी उघड केले. ते म्हणाले की, श्रीलंकेतील साखरेची सध्याची वार्षिक मागणी अंदाजे ६,००,००० मेट्रिक टन आहे आणि २०२२ मध्ये, श्रीलंकेने २८७ दशलक्ष डॉलर किमतीची कच्ची साखर आयात केली, ज्यामुळे तो जगातील ३२ वा सर्वात मोठी आयातदार देश बनला. श्रीलंकेत फक्त ४.५ टक्के साखरेचे उत्पादन होते. त्यामुळे आम्हाला मोठी स्थानिक क्षमता दिसते. कारण श्रीलंकेत वापरण्यात येणारी बहुतांश साखर आयात केली जाते. ऊसाच्या कचऱ्याचा वापर करून वीजनिर्मिती, इथेनॉल निर्मितीचाही विचार करू. तथापि, त्यांनी ऊस लागवडीत सहभागी होण्याची अपेक्षा नसल्याचे आणि शेतकरी आऊटग्रोअर नेटवर्कसह काम करण्यास प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले.