नाशिक : दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याने २०२३-२४ या गळीत हंगामात ३,२९,५८२ टन उसाचे गाळप करत १२.२२ टक्के साखर उतारा मिळवत ४,००,१०० क्विंटल साखर निर्मिती केली. त्याचबरोबर ३.६४ लाख लिटर इथेनॉल व ३६.७४ लाख लिटर स्पिरीट निर्मिती झाली. कारखान्याने हंगाम २०२३-२४ मधील एफआरपी पोटी अंतिम ऊस बिल ६४.२० रुपये प्रती टन यानुसार संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करत २७६४.२० रुपयांप्रमाणे १०० टक्के एफआरपी अदा केली आहे. कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी ही माहिती दिली.
अध्यक्ष शेटे यांनी सांगितले की, कारखान्याने आगामी गळीत हंगामाची तयारी सुरू केली असून, कार्यक्षेत्रामध्ये ३४२४ हेक्टर, पेठ सुरगाणा ३४५ हेक्टर ऊस लागवड नोंद झाली असून, गेटकेनमधून २९७३ हेक्टर ऊस लागवड नोंद झाली आहे. अशी एकूण ६,७४३ हेक्टर ऊस लागवडीची नोंद झाली आहे. तसेच कार्यक्षेत्र व गेटकेनमधून अजूनही नोंदी सुरू आहे. पुरेशा प्रमाणात ऊसतोड कामगार भरती करण्यात आली आहे. दरम्यान, शासनाने शेअर्सची रक्कम १०,००० रुपयांवरुन वाढवून १५,००० रुपये केली आहे. ज्यांचे शेअर्स दहा हजार आहेत, त्यांना २५ किलो, तर ज्यांचे शेअर्स पूर्ण होईल. त्यांना ५० किलो साखर सवलतीच्या दरात दिली जाणार आहे. शेअर्सची वाढीव रक्कम भरण्यास सहकार्य करावे, असे आवाहन उपाध्यक्ष शिवाजीराव बस्ते, सर्व संचालक, प्र. कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी केले.