सोलापूर : येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा ‘पांडुरंग ऊस भूषण’ पुरस्कार प्रमोद नाईकनवरे यांना देण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. २६) कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात कारखान्याच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘पांडुरंग ऊस भूषण’ व ‘पांडुरंग आदर्श शेतकरी’ पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी दिली.
गेल्या सहा वर्षांपासून कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना या पुरस्कारांनी सन्मानित केले जात आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. कारखान्याच्या संपूर्ण कार्यक्षेत्रातील जमिनीची सुपीकता टिकून राहावी. एकरी उत्पादन वाढ व्हावी. कारखान्याला अधिक साखर उतारा असणाऱ्या उसाचा पुरवठा व्हावा, त्यातून शेतकरी आणि कारखान्याची प्रगती व्हावी, हा या पुरस्काराचा मूळ उद्देश आहे. जमिनीची सुपीकता टिकवून अधिकचे ऊस उत्पादन घेणाऱ्या सभासद शेतकऱ्यास ‘पांडुरंग ऊस भूषण’ दिला जातो. या शेतकऱ्याला एक लाख एक हजार १११ रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविले जाणार आहे. तर कारखान्याच्या सात शेतकऱ्यांना २५ हजार आणि सन्मानचिन्ह देऊन ‘पांडुरंग आदर्श शेतकरी’ पुरस्काराने सन्मानित केले जाते.
कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक, उपाध्यक्ष कैलास खुळे आणि संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे मूल्यमापन करण्यात आले आहे. स्पर्धेतील शेतकऱ्यांना कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, केन मॅनेजर संतोष कुमठेकर, ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर यांनी विविध स्तरावर मार्गदर्शन केले आहे.
पुरस्कारांचे मानकरी
यंदाचा पांडुरंग ऊस भूषण पुरस्कार पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथील प्रमोद नाईकनवरे यांना घोषित करण्यात आला आहे. तर खर्डी- पंढरपूर गटातून नारायण रोंगे, वाखरी- देगाव गटातून भीमराव बागल, सिद्धेवाडी- चळे गटातून नागनाथ जाधव, भंडीशेगाव- भाळवणी गटातून चंद्रशेखर कोळवले, भोसे गटातून दत्तात्रय माळी, जळोली- करकंब गटातून धनाजी नरसाळे यांची पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.