धाराशिव : कळंब तालुक्यातील हावरगाव येथील डी.डी.एन. शुगर युनिट दोन हा खासगी साखर कारखाना यंदाच्या गाळप हंगामात कारखाना व्यवस्थापनाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा कारखाना आमदार राणाजगजितसिंह पाटील व मुरूड येथील उद्योजक दिलीप नाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला होता.
यंदा कारखाना व्यवस्थापनाने गाळप हंगाम सुरू न करण्याचा निर्णय घेतल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह कारखान्यावर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांना धक्का बसला आहे. या कारखान्याकडून दरवर्षी पावणेतीन ते तीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात येते. मात्र, अचानक यावर्षी गाळप हंगाम बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने का घेतला ? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. कारखाना कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र कमी असल्यामुळे गाळप हंगाम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती डीडीएन शुगर युनिट दोन चे संचालक विजय नाडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.