पुणे : घोडगंगा सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी घोडगंगा किसान क्रांतीच्या वतीने रविवारपासून (दि. २२) संपूर्ण शिरूर तालुक्यात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील श्री वाघेश्वर मंदिरातून सकाळी पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. या वेळी दादा पाटील फराटे म्हणाले की, एकेकाळी राज्यात अग्रेसर असलेला घोडगंगा कारखाना सध्या बंद पडला आहे. याला केवळ आमदार अशोक पवार जबाबदार आहेत. कारखाना वाचवण्यासाठी १२ वर्षांपूर्वी दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली होती. आता पुन्हा कारखाना बंद पडला असून त्यासाठी पुन्हा दौरा काढावा लागत आहे.
दादा पाटील फराटे म्हणाले की, ज्यांच्या हाती कारखान्याची २५ वर्षे सत्ता होती त्यांनीच कारखाना बंद पाडला. कामगारांचे पगार दिले नाहीत. कामगार उद्धवस्त झाला आहे. गेल्यावर्षी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस होता; परंतु ऊस वेळेत न तोडल्याने अनेक शेतकऱ्यांना पैसे देऊन आपला ऊस तोडावा लागला. यंदा कारखाना सुरू होणार की नाही, हे सभासदांना माहिती नाही. सत्ताधाऱ्यांना कारखाना चालू करा; नाहीतर राजीनामे द्या, असे सांगण्याची वेळ आली आहे. बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, शांताराम कटके, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, राजेंद्र कोरेकर, सागर खंडागळे, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, भाजप तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे आदींची भाषण झाले. एकनाथ शेलार, सचिन मचाले यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर फराटे इनामदार यांनी आभार मानले.