नवी दिल्ली : इथेनॉल उत्पादनाबाबत सरकारने अलीकडेच अनेक निर्णय घेतले असून त्यामुळे उद्योगांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे इथेनॉल उत्पादनाला चालना मिळेल, असे उद्योग तज्ज्ञांचे मत आहे. त्रिवेणी इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेडचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तरुण साहनी यांनी इथेनॉल उत्पादनावरील बंदी उठवण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. याबाबत ‘चीनीमंडी’शी बोलताना ते म्हणाले, उसाचा सिरप आणि बी-हेवी मोलॅसिसमधून इथेनॉल उत्पादनावरील मर्यादा काढून टाकण्याचा अलीकडील निर्णय भारतातील इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या दृढ वचनबद्धतेचे स्पष्ट संकेत आहे. धोरणातील हे बदल साखर कारखान्यांना उपलब्ध फीडस्टॉकचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी अधिक लवचिकता प्रदान करकीव, हंगाम २०२५-२६ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य साध्य करण्याच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी लक्ष्याला प्रभावीपणे समर्थन मिळाले आहे. उसाचे सिरप आणि बी-हेवी मोलॅसिस यांसारख्या विविध संसाधनांचा वापर करून साखर कारखाने आता उद्दिष्टपूर्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
तरुण साहनी म्हणाले की, “याशिवाय, अतिरिक्त फीडस्टॉक म्हणून एफसीआयकडील २.३ दशलक्ष टन तांदूळ समाविष्ट केल्याने केवळ इथेनॉल उत्पादन क्षमताच वाढली नाही तर इथेनॉल पुरवठा साखळीची कार्यक्षमता आणि अनुकूलतादेखील वाढते. हे धोरणात्मक पाऊल अधिक वैविध्यपूर्ण आणि लवचिक पुरवठा साखळी निश्चित करेल. यातून साखर उत्पादनावरील परिणाम कमी होईल आणि देशांतर्गत पुरवठ्याच्या स्थिरतेचे उद्दिष्टही साध्य होईल. अलीकडेच, सरकारने साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरीजना इथेनॉल पुरवठा वर्ष (ईएसवाय) २०२४-२५ यांदरम्यान उसाचा रस, बी-हेवी मोलॅसिस आणि सी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल तयार करण्याची परवानगी दिली आहे. याव्यतिरिक्त, सरकारने पूर्वीची बंदी उठवली आहे.
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय)कडील स्टॉकमधील २.३ दशलक्ष टन तांदूळ धान्य-आधारित इथेनॉल डिस्टिलरीजना विकण्याची परवानगी दिली आहे. सरकारने साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरीजना उसाचा रस आणि बी-हेवी मोलॅसिसपासून रेक्टिफाइड स्पिरिट (आरएस) आणि एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल (ईएनए) तयार करण्याची परवानगी दिली आहे. उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार, एक सप्टेंबर २०२४ पर्यंत, एकूण ८२,६१७ पीएसयू रिटेल आउटलेटपैकी १६,०५९ पीएसयू आउटलेट्स ई २० इथेनॉल-मिश्रित मोटर स्पिरिटचे वितरण करत आहेत. ऑगस्टमध्ये, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण १५.८ टक्क्यांपर्यंत पोहोचले आणि नोव्हेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२४ पर्यंत एकत्रित इथेनॉल मिश्रण १३.६ टक्क्यांपर्यंत पोहोचले.