ऊसाचे 100 रुपये थकीत : स्वाभिमानी शेतकरी संघटना अमित शाहांना, राज्यपालांना काळे झेंडे दाखवणार

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 2022-23 हंगामातील तुटलेल्या ऊसाला प्रतिटन 400 रुपये आंदोलन केले होते. यानंतर 100 रुपयांवर तोडगा काढण्यात आला होता. मात्र, 100 रुपये देण्याला मान्यता देण्यात न आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूर दौऱ्यावर येत असलेल्या केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह आणि राज्यपाल सी राधाकृष्णन यांच्या दौऱ्यात निदर्शने करून काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत.

महापूर व महागाईमुळे शेतकरी मेटाकुठीस आला आहे. यामुळे मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांच्या अकार्यक्षमतेचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व राज्यपाल सी. राधाकृष्णन यांच्यासमोर निदर्शने करून काळे झेंडे दाखविण्यात येणार असल्याचे निवेदन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सदरचा दुसरा हप्ता मान्यतेसाठी साखर आयुक्त यांचेमार्फत गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये मुख्य सचिवांकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. जवळपास 10महिने झाले याबाबत मुख्य सचिव यांचेकडून याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही. याबाबत जवळपास सहावेळा मुख्य सचिव व चार वेळा मुख्यमंत्री यांना याबाबत समक्ष भेटूनही कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here