अहिल्यानगर : पद्मश्री डॉ. विखे पाटील साखर कारखान्याला येत्या गळीत हंगामात ऊस पुरवठा करण्यासाठी ट्रक मालकांनी कारखाना-ट्रक मालक- मुकादम असा त्रिपक्षीय करार करावा, अशी सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. प्रवरानगर येथील आमदार विखे पाटील सहकारी ट्रक्स वाहतूक संस्थेच्या ४७ व्या अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेत मंत्री विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी होते. यावेळी अॅड. आप्पासाहेब दिघे, ज्येष्ठ कार्यकर्ते शांतीनाथ आहेर, बाबासाहेब दळे, संभाजी देवकर, साहेबराव दळे, विजय लगड, उप सभापती अण्णासाहेब कडू, सहा. निबंधक रावसाहेब खेडकर आदी उपस्थित होते.
मंत्री विखे म्हणाले की, पद्मश्री डॉ. विखे पाटील साखर कारखान्याच्या वाटचालीत गेली ४७ वर्षे ट्रक्स वाहतूक संस्थेचे मोलाचे योगदान राहिले आहे. राज्यातील अनेक साखर कारखाने ऊस पुरवठ्यासाठी एजन्सी नेमतात. आपण मात्र ट्रक्स वाहतूक संस्थेच्या माध्यमातून हे काम करतो. काळ बदलला आहे. ट्रक्स मालकांनी ऊस पुरवठ्याची जबाबदारी घेतली पाहिजे. यासाठी कारखाना सर्वोतोपरी सहकार्य करील. कारखाना-ट्रक मालक-मुकादम असा त्रिपक्षीय करार करून येत्या हंगामात ट्रक्स मालकांनी ऊस पुरवठ्याची जबाबदारी घ्यावी असे सांगत, हार्वेस्टरचा जास्तीत जास्त वापर करणे काळाची गरज आहे. कारखाना तुमच्या पाठीशी उभा आहे. कार्यक्षमतेने ऊस वाहतूक करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. या सभेसाठी संचालक बाळासाहेब गोरे, प्रमोद नालकर शिवाजी इलग, अलका आरगडे, दत्तात्रय शिंदे, मारुती गायकवाड, मुकूंद तांबे, तबाजी लोखंडे, भारत वाकचौरे, वाहिद पटेल, मंदाबाई रांधवणे, अशोक आहेर, पिरमहंमद पटेल आदी उपस्थित होते.