मुंबई : साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार आणि साखर सहसंचालक मंगेश तिटकारे यांनी लिहिलेल्या ‘एफआरपी माहिती पुस्तिका २०२४’चे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईत झाले. मंत्रिसमितीच्या बैठकीनंतर साखर उद्योगातील मान्यवरांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी पुस्तिकेचे प्रकाशन केले.यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे, सहकार खात्याचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा आदी उपस्थित होते.तिटकारे यांनी ‘इक्षुदंड ते इथेनॉल’सारख्या सहकार आणि साखर उद्योग क्षेत्रासंबंधी अनेक पुस्तकांचे लेखन आणि सहलेखन केले आहे.
दरम्यान,सोमवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक पार पडली.मंत्री समितीच्या बैठकीत गाळप हंगाम सुरू करण्यासाठी १५ नोव्हेंबर ही तारीख एकमताने ठरवण्यात आली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा उसाचे क्षेत्र २ लाख हेक्टरने कमी झाले असून साखर कारखान्यांसाठी परिपक्व उसाचा पुरवठा व्हावा आणि रिकव्हरी चांगली निघावी यासाठी १५ नोव्हेंबर ही तारीख ठरवण्यात आली आहे.त्यामुळे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत १५ दिवसांनी उशिरा साखर कारखाने सुरू होणार आहेत.